📰 ताज्या बातम्या

सावरगाव वायाळचा ग्रामसेवक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

च
श्याम सुंदर चित्तोडा
19 नोव्हेंबर 2026•⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp
गजानन माळकर पाटील तालुका प्रतिनिधी मंठा.. 
: रोजगार सेवकाच्या मानधनाचा धनादेश (चेक) दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे १३ हजार रुपयांची लाच मागून, त्यापैकी १० हजार रुपये स्वीकारताना सावरगाव वायाळ (ता. मंठा) येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्याला (ग्रामसेवक) जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर २०२६) सायंकाळी मंठा शहरातील जालना रोड परिसरात करण्यात आली.
अनिल तुकाराम चव्हाण (वय ४९, रा. सुभाष जाधव यांचे घरी किरायाने, सुगंधा नगर, जालना रोड, मंठा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
यातील तक्रारदार (वय ३२) हे रोजगार सेवक म्हणून कार्यरत आहेत. ग्रामपंचायत अधिकारी अनिल चव्हाण यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी तक्रारदाराला त्यांच्या मानधनाचा २४ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. हा धनादेश दिल्याच्या मोबदल्यात चव्हाण यांनी ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदाराने नाईलाजास्तव १ हजार रुपये दिले होते आणि उर्वरित ५ हजार रुपये नंतर देण्याचे सांगितले होते.
त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२६ रोजी चव्हाण यांनी तक्रारदाराला त्यांच्या मानधनाचा आणखी ४८ हजार रुपयांचा धनादेश दिला. या नवीन धनादेशाच्या मोबदल्यात ८ हजार रुपये आणि मागील बाकी असलेले ५ हजार रुपये, असे एकूण १३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १८ नोव्हेंबर रोजी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली.
पडताळणी आणि सापळा कारवाई
तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने १८ नोव्हेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. यावेळी मंठा येथील जालना रोडवरील धनेश्वरी हार्डवेअर येथे आरोपी चव्हाण यांनी तक्रारदाराकडे १३ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सापळा रचून सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांच्या सुमारास धनेश्वरी हार्डवेअर येथेच तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अनिल चव्हाण यांना पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीला रात्री ९ वाजून २२ मिनिटांनी अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे आणि अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली, जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाळू जाधवर (सापळा व पर्यवेक्षक अधिकारी) यांच्या नेतृत्वात पो.ह. गजानन घायवट, पो.हे. गणेश चेके आणि चा.पो.ह. विठ्ठल कापसे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
नागरिकांना आवाहन : कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (दूरध्वनी: ०२४८२-२२७२५२, १०६४ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक: ९७६४०२१०६४) संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰
📡आपण ऑफलाइन आहात