📰 ताज्या बातम्या

चिमुकल्यांच्या सुरेल गायनाने धोपटेश्वरची दिवाळी पहाट रंगली!

च
श्याम सुंदर चित्तोडा
10 नोव्हेंबर 2026•⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp
नवनाथ गव्हाणे 
बदनापूर / प्रतिनिधी
धोपटेश्वर :दिवाळी पहाट म्हटले की मोठमोठ्या शहरांमध्ये रंगणाऱ्या सुरेल संगीत मैफली डोळ्यांसमोर येतात. मात्र, शहरांपुरती मर्यादित असलेली ही संगीत परंपरा आता ग्रामीण भागातही रुजत असून, धोपटेश्वर येथे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरेल स्वरांनी दिवाळीची पहाट अविस्मरणीय ठरली. स्व. गंगासागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘सुरमयी दिवाळी पहाट’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य ह.भ.प. तुळशीराम महाराज दाभाडे गुरुजी यांच्या संकल्पनेतून धोपटेश्वर येथील त्यांच्या निवासस्थानी असलेल्या ‘सागर कुंज’ येथे सलग तिसऱ्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगीत कलेचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि ग्रामस्थांना पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भक्तिसंगीताचा आनंद घेता यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन, नमन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सुरेल गीतांचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे, विद्यालयातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही अत्यंत आत्मविश्वासाने गायन सादर करत उपस्थित रसिकांची मने जिंकली. त्यांच्या निरागस आवाजातील सुरेल गीतांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली. पहाटेच्या शांत आणि प्रसन्न वातावरणात भक्तिसंगीताच्या स्वरांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता.

चिमुकल्यांच्या सुरांना कलाकारांची दमदार साथ!

या संगीत मैफलीला साथसंगतीसाठी निवेदक श्री. डॉ. रामेश्वर पाटील,श्री. संदीप गुंजकर व श्री. जय कराड यांनी तबल्याची, तर श्री. विठ्ठल काळे यांनी पखवाजाची साथ दिली. श्री. भार्गव गुंजकर यांनी टाळध्वनीची साथ देत कार्यक्रमाची रंगत वाढवली. अनुभवी कलाकारांच्या सुरेल साथसंगतीमुळे विद्यार्थ्यांच्या गायनाला विशेष उठाव मिळाला.

कार्यक्रमाच्या समारोपाला श्री. संतोष वाघ आणि श्री. तुळशीराम दाभाडे यांनी सादर केलेल्या ‘सजल नयन नित धार बरसती’ आणि ‘कैवल्याचा चांदण्याला’ या गीतांनी उपस्थित रसिकांना भावविभोर केले. या गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण वातावरणात झाली.

ग्रामीण भागात संगीत संस्कृती रुजविण्याचा स्तुत्य उपक्रम!

आजच्या धावपळीच्या जीवनात संगीत, भजन आणि सांस्कृतिक परंपरांचे महत्त्व जपण्यासोबतच नव्या पिढीमध्ये संगीताची आवड निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ह.भ.प. तुळशीराम महाराज दाभाडे गुरुजी सातत्याने करीत आहेत. सलग तीन वर्षांपासून आयोजित करण्यात येणारा हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कलाविष्काराची संधी देणारा ठरत आहे. शहरांमध्ये होणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आनंद ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या गावातच अनुभवता यावा, ही या उपक्रमाची खरी विशेषता ठरली आहे.

यावेळी बदनापूर-अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे, सद्गुरू सोलारचे संचालक शिवाजी पाटील शिंदे, अनिलराव कोलते, जयप्रकाश चव्हाण, राम पाटील शिरसाट, पुरुषोत्तमजी जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच ह.भ.प. पंढरीनाथ महाराज तावरे (नाना) व ह.भ.प. प्रभाकर महाराज शास्त्री यांचे शुभाशीर्वाद लाभले.

आयोजन, नियोजन आणि सहकार्याने कार्यक्रमाला लाभली भव्यता!

या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन व नियोजन स्वरसाधना संगीत परिवार, समस्त ग्रामस्थ, मित्रमंडळ परिवार धोपटेश्वर यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी सोलकॅप सोलार व नाथ हायड्रॉलिक्स यांचे विशेष सहकार्य लाभले. सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी ‘वारकरी वादळ’व ‘सुरमय मराठीचे सिद्धेश शेळके यांनी सहकार्य केले. ध्वनी व्यवस्था चैतन्य साउंड, जालना, तर रंगमंच व्यवस्था सत्संग मंडप, अकोला (नि.) यांच्या वतीने करण्यात आली.

ग्रामीण भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कंठातून उमटलेले भक्तिसंगीताचे स्वर, कलाकारांची सुरेल साथ, मान्यवरांची उपस्थिती आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे धोपटेश्वरची दिवाळी पहाट केवळ एक संगीत कार्यक्रम न राहता ग्रामीण भागातील संगीत संस्कृतीला नवी दिशा देणारा अविस्मरणीय सोहळा ठरला.
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰
📡आपण ऑफलाइन आहात