येथील विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये आज, १० सप्टेंबर रोजी शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने शाडू मातीचे सुंदर गणपती बाप्पा साकारत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण धडा गिरवला.
कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. जी. बाहेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्ती दिसायला आकर्षक वाटत असल्या, तरी त्या पर्यावरणासाठी आणि जलचरांसाठी अत्यंत घातक ठरतात. त्याऐवजी पाण्यात सहज विरघळणाऱ्या शाडू मातीच्याच मूर्तींची प्रतिष्ठापना करणे काळाची गरज आहे."
तसेच, "अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना हक्काचा वाव मिळतो आणि त्यांच्यात निसर्गाविषयी सजगता निर्माण होते," असे मत शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. संदीप बाहेकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळा, परतूरच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता शिंदे व लिओ क्लब चे पदाधिकारी प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित होत्या.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विवेकानंद पब्लिक स्कूलचे प्राचार्य विजयकुमार दंदाले, विवेकानंद इंग्लिश स्कूलचे प्राचार्य भालचंद्र महाजन यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती साकारण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. शाळेने यापुढेही असे नवनिर्मितीक्षम उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी या वेळी केली.