गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीचा उल्लेख करत आमदार लोणीकर यांनी, “महाराष्ट्रातील बळीराजावर आलेले संकट दूर व्हावे, राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवन मिळावे आणि प्रत्येक शेतकरी सुखी व समाधानी व्हावा,” अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली.
गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने अनेक भागांतील खरीप पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. सोयाबीन, कापूस यासह विविध पिकांवर पावसाच्या खंडाचा विपरीत परिणाम होत असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा केवळ उत्सवाचा न राहता बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्याचा उत्सव ठरावा, अशी भावना आमदार लोणीकर यांनी व्यक्त केली.
*धार्मिक भावना जपत गणेशोत्सव साजरा करा*
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्यातील गणेश मंडळे, कार्यकर्ते आणि नागरिकांना गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि धार्मिक भावना जपत साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असून, या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत व्हावी. गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच शेतकरी आणि समाजाच्या हिताचे उपक्रम राबवावेत, असे आवाहनही लोणीकर यांनी केले.
“विघ्नहर्त्या गणरायाने महाराष्ट्रातील दुष्काळाचे संकट दूर करावे, वरुणराजाची कृपा व्हावी आणि बळीराजाच्या शेतात पुन्हा हिरवाई नांदावी,” अशी मनोकामना आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली.