"राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला असला, तरी बळीराजाच्या हाती प्रत्यक्ष मदत शून्य आहे. केवळ कागदावर घोषणांचा पाऊस पाडून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. मागच्या वर्षी जाहीर केलेले अतिवृष्टीचे ३२ हजार कोटींचे पॅकेज कुठे गेले? आणि जलयुक्त शिवार योजनेवर खर्च झालेले १२ हजार कोटी नेमके कुठे जिरले? निवडणुका संपताच ९५ लाख लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढून वाऱ्यावर सोडणाऱ्या या लबाड सरकारने शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर सोडले आहे," असा संतप्त सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
परतूर तालुक्यातील वरफळ येथील शेतकरी आयोध्या गंगाधर जाधव यांच्या गट क्रमांक २५५ मधील ७ एकर क्षेत्रातील नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची त्यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केली आणि हताश झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
"मी राजकारण करायला नाही, कुटुंबप्रमुख म्हणून आलोय"
पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, "मी येथे कोणतेही राजकारण करण्यासाठी आलेलो नाही. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्पष्ट सूचनेनुसार जिथे जिथे शेतकरी संकटात सापडला आहे, तिथे शिवसेना एक कुटुंबप्रमुख म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. शेतकरी कोणत्याही पक्षाचा असो अथवा जाती-धर्माचा, संकटाच्या या काळात त्याला विनाअट आणि थेट मदत मिळवून देणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी तातडीने मदत केंद्रे सुरू केली जात असून, जाहीर झालेली मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात पडेपर्यंत शिवसैनिक शासनदरबारी पाठपुरावा करतील."
बँकेच्या जप्ती नोटिसा तात्काळ थांबवा; प्रमुख मागण्या
यावेळी दुष्काळग्रस्त परिस्थितीवर बोट ठेवत ठाकरे यांनी शासनापुढे थेट मागण्या मांडल्या यामध्ये जप्ती व वसुली नोटिसांना स्थगिती - दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडून दिल्या जाणाऱ्या जप्ती व कर्जवसुलीच्या नोटिसा तातडीने बंद करण्यात याव्यात. कर्जमाफी व पीकविमा वितरण - संपूर्ण कर्जमाफीची त्वरित अंमलबजावणी करावी, ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आली आहेत त्यांना तात्काळ लाभ द्यावा आणि पीकविम्याची थकीत रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. हिशोब जाहीर करा - जलयुक्त शिवारच्या १२ हजार कोटींचा आणि अतिवृष्टीच्या ३२ हजार कोटींच्या पॅकेजचा नेमका काय उपयोग झाला, याचा जाब सरकारने जनतेला द्यावा. विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करा - दुष्काळ आणि नापिकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि चारा छावण्यांच्या आधारावर जगणाऱ्या कुटुंबांतील मुला-मुलींचे संपूर्ण वर्षाचे परीक्षा व शैक्षणिक शुल्क शासनाने १०० टक्के माफ करावे.
"शिक्षण कसं करायचं?" — विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ठाकरे संतप्त
पाहणीदरम्यान परिसरातील विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. "शेतातले पीक पूर्णपणे वाया गेले असून हातात एक रुपयाही उत्पन्न उरलेले नाही, अशा बिकट परिस्थितीत आम्ही पुढे शिक्षण कसे घ्यायचे? फी कुठून भरायची?" असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांची व्यथा ऐकून आदित्य ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त करत सरकारच्या बेफिकीर धोरणावर ताशेरे ओढले. शेतकऱ्यांनी पिकांसाठी केलेला खर्च, नापिकी आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे प्रपंच कसा चालवायचा, या विवंचनेत बळीराजा अडकल्याचे त्यांनी नमूद केले.
"शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका; आत्महत्या करू नका!"
बळीराजाला अत्यंत भावनिक साद घालत आदित्य ठाकरे म्हणाले, "संकटे कितीही मोठी असली तरी माझ्या शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये. कोणत्याही परिस्थितीत आत्महत्येसारखे टोकाचे आणि घातक पाऊल उचलू नका. उद्धव ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. कोणतीही अडचण किंवा संकट असल्यास निःसंकोचपणे आम्हाला सांगा; तुमच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून शेवटच्या क्षणापर्यंत लढा देईल."
या पाहणी दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासमवेत विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार राहुल पाटील, आ. कैलास पाटील, उपनेते डॉ. विवेक नावंदर, संपर्क प्रमुख प्रदिपकुमार खोपडे, परभणी चे महापौर इकबाल भाई, शिवसेना नेत्या आयोध्या पौळ, शिवसेना जालना जिल्हाप्रमुख महेश नळगे, नगरपालिका गटनेते गणेश नळगे, ज्येष्ठ नेते माधवराव कदम, मंठा तालुकाप्रमुख भारत पंडीत, संजय खंदारे, गणेश दराडे, अशोकराव आढाव, आबा कदम, दत्ता पाटील सुरुंग, राहुल कदम, माऊली सरकटे, विठ्ठल वटाने, विष्णुपंत जगताप, दिपक काळे, संदिप पाचारे यांच्यासह महिला शेतकरी, स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक, विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते आणि परतूर मंठा तालुका व वरफळ परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.