📰 स्थानिक (जालना / परतूर)

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

शामसुंदर चित्तोडा
11 सप्टेंबर 2026⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp
आंबा (ता. परतूर), प्रतिनिधी : एकीकडे शिवारावर दुष्काळाचे सावट, पावसाअभावी संकटात आलेली पिके आणि दुसरीकडे वर्षभर शेतीच्या कामात साथ देणाऱ्या सर्जा-राजाप्रती असलेले प्रेम व कृतज्ञता अशा वातावरणात परतूर तालुक्यातील आंबा येथे सालाबादप्रमाणे यंदाही पारंपरिक बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. दुष्काळाची चिंता चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतानाही शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना सजवून मनोभावे पूजा केली.

सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाअभावी खरीप पिकांच्या उत्पादनाबाबत चिंता वाढली असून, यंदाच्या बैलपोळा सणावरही दुष्काळी परिस्थितीचा परिणाम दिसून आला. मात्र परिस्थिती कितीही कठीण असली तरी कृषी संस्कृतीची परंपरा जपण्याचा निर्धार आंबा येथील शेतकऱ्यांनी कायम ठेवला.

पोळ्यानिमित्त सकाळपासूनच गावात उत्साहाचे वातावरण होते. शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाला स्वच्छ धुऊन शिंगांना रंगरंगोटी केली. आकर्षक झूल, गोंडे, फुले आणि विविध सजावटीच्या साहित्याने बैलांना सजविण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजा करून वर्षभर शेतीच्या कामात मोलाची साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. गावातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आल्याने पोळ्याच्या उत्सवाला पारंपरिक स्वरूप प्राप्त झाले.

उत्सवात आनंद; मनात मात्र पावसाची चिंता

बैलपोळ्याचा उत्साह असला तरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुष्काळाची चिंता स्पष्टपणे जाणवत होती. खरीप हंगामातील पिकांना आता पावसाची नितांत आवश्यकता असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. उपलब्ध पाण्यावर पिके जगविण्याची धडपड सुरू असून बळीराजा आता पूर्णपणे निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे.

‘निदान या महिन्यात तरी दमदार पाऊस पडावा, शिवारातील पिकांना जीवदान मिळावे आणि शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे,’ अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. दुष्काळाच्या संकटातही आपल्या कृषी संस्कृतीची परंपरा जपत आंबा येथील ग्रामस्थांनी सर्जा-राजाचा पोळा उत्साहात साजरा केला.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰
📡आपण ऑफलाइन आहात