सध्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अपुऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी केलेला खर्चही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्पादन घटल्याने अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याचे सोळंके यांनी म्हटले आहे.
विविध समारंभांमध्ये सजावट, रोषणाई, आतषबाजी आणि इतर दिखाऊ बाबींवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. या खर्चाला मर्यादा घालून त्यातील काही रक्कम दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबे, विद्यार्थ्यांचे शिक्षण, जनावरांचा चारा तसेच गरजूंच्या जीवनावश्यक गरजांसाठी दिल्यास त्यांना मोठा आधार मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले.
“आपल्या आनंदातील थोडासा हिस्सा संकटग्रस्त शेतकरी बांधवांसाठी देणे हीच खरी माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी आहे. मदतीची रक्कम किती आहे, यापेक्षा मदतीमागील भावना महत्त्वाची आहे. समाजाने एकत्रित प्रयत्न केल्यास अनेक शेतकरी कुटुंबांना संकटातून सावरण्याचे बळ मिळेल,” असे दत्ता सोळंके यांनी स्पष्ट केले.
‘दिखाव्यावरील खर्च कमी करूया आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हातभार लावूया,’ असा संदेशही त्यांनी नागरिकांना दिला.